GadchiroliLatest NewsMaharashtra Politics

मुत्तापूर आशासेविका भरतीत घोटाळा? नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी

सिरोंचा तालुक्यातील मुत्तापूर गावातील आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत गंभीर घोटाळा झाल्याचा आरोप समोर आला आहे. झिंगानूर येथील रवली आनंदराव कुमरी यांनी या संदर्भात तहसीलदार सिरोंचा यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सदर भरतीची चौकशी करून नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. रवली कुमरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा अंतर्गत मुत्तापूर गावात आशा स्वयंसेविका पदासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी गावातील अनेक महिलांनी अर्ज सादर केले होते. ४ सप्टेंबर रोजी सिरोंचा तालुका आरोग्य कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, भरती प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित न करता थेट अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. रवली कुमरी यांनी सांगितले की, माझे शिक्षण इयत्ता १० वी पर्यंत असून मला ६९.४०% गुण आहेत. तर निवड झालेली उमेदवार ललिता भास्कर कुम्मरी हिला फक्त ५३% गुण असून ती मराठी भाषेत व्यवस्थित बोलूही शकत नाही. तरीही तिचे गुण वाढवून तिला पात्र ठरवण्यात आले. याशिवाय, ललिता कुम्मरी ही अनुसूचित जातीची असून तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार धर्मांतर केलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ देऊ नये, असे स्पष्ट केल्यावरही तिला या पदावर नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप रवली कुमरी यांनी केला आहे. रवली कुमरी यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा आणि चुकीने दिलेला नियुक्ती आदेश रद्द करावा, अशी मागणी तहसीलदारांना केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button