यवतमाळ–वाशिम जिल्ह्यातील लाखो शेतकरी अतिवृष्टीमुळे उध्वस्त

यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात मे ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या सततच्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. वाशिम जिल्हा – तब्बल १६,२०२ शेतकरी बाधित झाले असून १०,७२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्हा – तब्बल ३,११,०२१ शेतकरी प्रभावित झाले असून २,३४,८५३ हेक्टर क्षेत्रावर पिकं पाण्याखाली गेली आहेत. कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाहून गेल्याने कर्ज फेडणे, घरखर्च चालवणे आणि पुढील हंगामाची तयारी करणं कठीण झालं आहे. मुख्यमंत्री १३ सप्टेंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर आले होते आणि “पूर्ण मदत दिली जाईल” असं आश्वासन दिलं होतं, मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही, असा आरोप खासदार देशमुख यांनी केला आहे. त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की – तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी, पिक विमा कंपन्यांकडून त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी, घरं, जनावरे, रस्ते यांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावं, सिंचन प्रकल्प, नदी खोलीकरण आणि जलव्यवस्थापनाच्या दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात. देशमुख यांनी इशारा दिला आहे की जर शासनाने तात्काळ मदत केली नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण पुन्हा वाढण्याची भीती आहे.
याचबरोबर त्यांनी सांगितले की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे आणि या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घेऊन तातडीने मदत मिळवून द्यावी, हीच नम्र विनंती आहे.



