मेळघाट शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी खावटी कर्ज अनुदान आणि मका खरेदी केंद्राची मागणी – आमदार केवलराम काळे यांची मुंबईत बैठकीत ठोस भूमिका

मेळघाट – मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आमदार केवलराम काळे यांनी १६ सप्टेंबर रोजी मुंबईत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना खावटी कर्जावर अनुदान देण्याची तसेच मका खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. मेळघाटात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होत असून, बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. यासाठी शासकीय दराने खरेदी करून शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम दिली जावी, अशी सूचना त्यांनी केली. बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंत्री डॉ. उईके यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे मेळघाटातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



