दारूच्या नशेत सख्या भावाने भावाचाच केला खून, आरोपी अटकेत

वडाळी – ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील वडाळी गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळी येथील राघव श्रावण गवळी (वय ३४) हा दारूच्या नशेत घरी येऊन त्याच्या पत्नी व मुलांना मारहाण करत होता. हा प्रकार पाहून मोठा भाऊ फकीरा श्रावण गवळी त्याला समजावण्यासाठी गेला. याच दरम्यान राघव आणि फकीरा यांच्यात किरकोळ वाद झाला. अचानक राघव याने संतापाच्या भरात खलबत्यातील मुसळ उचलून फकीरा यांच्या डोक्यावर जबर मारले. या हल्ल्यात फकीरा गंभीर जखमी झाला.
तत्काळ त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, रविवारी (ता.१४) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून घरातील किरकोळ भांडणाने जीव घेतल्याची चर्चा सुरू आहे. घटनेबाबत मंगळवारी (ता.१६) अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राघव गवळी याला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा ठाण्याचे पोलीस करीत आहेत.



