रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा टाळा; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई : आगामी रब्बी हंगामात राज्यात युरियाचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून तातडीने युरियाचा अतिरिक्त पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
सध्या महाराष्ट्रात केवळ २.३६ लाख मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी तातडीच्या पुरवठ्याची गरज असल्याचे मंत्री भरणे यांनी नमूद केले आहे.
केंद्राकडून अपेक्षित वाटप अपुरे
एप्रिल ते जुलै दरम्यान केंद्राकडून राज्याला १०.६७ लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप अपेक्षित होते, परंतु केवळ ८.४१ लाख मेट्रिक टन म्हणजेच ७९% पुरवठाच झाला. त्यातच ऑगस्ट महिन्यात २.७९ लाख मेट्रिक टन वाटपाच्या तुलनेत फक्त ०.९६ लाख मेट्रिक टन युरिया मिळाला आहे.
रब्बीसाठी यंदा मागणी अधिक
राज्यात यंदा खरीप हंगामात १४४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, मक्याच्या पेरणीत ५४% वाढ झाली आहे. यामुळे कापूस, मका यांसारख्या पिकांसाठी टॉप ड्रेसिंगसाठी युरियाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
रब्बी हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन युरियाचा प्रस्ताव
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतील पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ लाख मेट्रिक टन युरियाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी विनंतीही कृषी मंत्री भरणे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
मागण्या थोडक्यात :
ऑगस्ट महिन्यातील उर्वरित युरियाचे तातडीने वाटप करावे
प्रलंबित आयात युरिया त्वरित उपलब्ध करून द्यावा
आगामी रब्बी हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी



