८ किलो गांजा जप्त, २ लाखांचा मुद्देमाल

चांदुर रेल्वे – चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात १५ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त खबरीनंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. माहितीप्रमाणे एक इसम मालखेड ते अमरावती मार्गे लालखेड रस्त्याने ८ किलो गांजा घेऊन जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेडचे नियोजन केले.
राजपत्रित अधिकारी, दोन पंच, फोटोग्राफर आणि वजन काट्यासह पथक तयार करण्यात आले. देशमुख यांच्या शेताजवळ संशयास्पदरीत्या चालणाऱ्या एका व्यक्तीस थांबवून चौकशी करण्यात आली.
त्याने आपले नाव संजय बापुराव आडे (वय ४०, रा. लालखेड) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या थैलीची पंचासमक्ष तपासणी केली असता चार टेप गुंडाळलेली पॅकेट्स मिळाली, ज्यामध्ये एकूण ८ किलो गांजा आढळला.
या अंमली पदार्थाची किंमत तब्बल २ लाख रुपये एवढी असून आरोपीकडून रेडमी मोबाईलसह एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



