शहर बसमध्ये लोंबकळत करावा लागतो प्रवास, अघटीत घडल्यास जबाबदार कोण

शहर बसमध्ये प्रवाशांना दाराच्या शेवटच्या पायरीवर उभे राहून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी अघटीत घटना घडल्यास जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न प्रवाशी करीत आहेत. विशेष म्हणजे शहर बसमध्ये तिकीट तपासणीस असलेली एक तरुणीच प्रवाशाांना अशा प्रकारचा प्रवास करावयास भाग पाडत आहे.
शहरात सुरू असलेल्या शहर बसेसमधील नवसारी किंवा विद्यापीठात जाणा-या बसेस ह्या दररोज खचाखच भरून जातात. बसेसमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणा-या विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने असतात. बसेसच्या मागील दाराच्या शेवटच्या पायरीपर्यंत प्रवाशी खचाखच भरलेले असतात. त्यामुळे बसमध्ये बसणारे प्रवाशी समोरील दारातून आंत चढण्याचा प्रयत्न करतात, मात्र तिकीट तपासणीस असलेली तरुणी समोरील दारातच उभी असते व ती कोणालाही समोरील दारातून आत येवू न देता मागील दारातून जाण्यास भाग पाडते. बसेसच्या मागील दाराच्या शेवटच्या पायरीपर्यंत आधीच प्रवाशी लोंबकळत प्रवास करीत असतांनाही ती तिकीट तपासणीस मात्र समोरील दारातून प्रवाशांना घेत नाही. अशावेळी नाईलाजास्तव नागरिकांना मागील दारातूनच उभे राहून प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान कोणत्याही वेळी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर अघटीत घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सोमवारी अनेक प्रवाशी व्यक्त करीत होते. त्यातच त्या तिकीट तपासणीस युवतीने जो होता वह कर लो अशा शब्दात प्रवाशांना उत्तर दिल्यामुळे महापालिका प्रशासन तसेच शहर बसेसचे संचालन करणा-यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.



