धामणगाव पोलिसांनि केली ५० गोवंशांची सुटका, आयसर वाहनसह ३ आरोपी ताब्यात

महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. धामणगाव (देवगाव) महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाने आयसर वाहन पकडून तब्बल ४० ते ५० गोवंश वाचवले आहेत. तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, वाहन जप्त करण्यात आले आहे.
महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव (देवगाव) यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, लालसर रंगाचे आयसर वाहन क्रमांक MH40CT4812 टोल नाक्यावरून पळून गेले आहे. तत्काळ पथकाने देवगाव चौफुली येथे नाकाबंदी लावली. पोलीस उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
वाहन थांबवून चालकास चौकशी केली असता त्याने आपले नाव बलकरण बाजु नागवंशी असे सांगितले. त्याच्यासोबत सुकरलाल जोगी खारे आणि सोनू शिवनाथ मेहलवंशी हे दोघेही ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात लाकडी पट्ट्यांनी बनवलेले दोन कप्पे असून वरच्या कप्प्यात २० ते २५ आणि खालच्या कप्प्यात २० ते २५ अशा मिळून ४० ते ५० गोवंश जातीची जनावरे आढळली. ही जनावरे गायी व बैल असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. वाहन व आरोपींना ताब्यात घेऊन तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींवर गोवंश तस्करीसंबंधी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या हालचालींची माहिती पोलिसांना देत सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महामार्ग पोलिसांच्या या कारवाईमुळे तब्बल ५० जनावरांचे प्राण वाचले आहेत. या प्रकारामुळे गोवंश तस्करीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.



