Latest NewsMaharashtra

मालेगाव शिक्षण घोटाळा ९५ दिवस फरार आरोपींना अखेर अटक

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील यादवराव नारायण जाधव फुले शिक्षण संस्था, संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळांमध्ये बनावट शिक्षक भरतीसंदर्भातील प्रकरण प्रकाशात आले आहे. शिक्षक भरतीसाठी शालार्थ आयडी प्रस्ताव तयार करताना मंत्रालयाच्या बनावट पत्रांचा, खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला गेला, असे तपासात उघड झाले आहे. छावणी पोलिस ठाण्यात २ जून २०२५ रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तब्बल ९५ दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. पोलिस यंत्रणेच्या या अपयशामुळे संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संताप होता. मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तीन फरार आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या आहेत. जेरबंद आरोपी आहेत – सुधीर पाटील, सुधीर पगार आणि उदय देवरे. या सर्वांना १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासात असेही उघड झाले की, मालेगाव हायस्कूल आणि अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल १३ शिक्षकांची भरती मागील तारखांना दाखल करून करण्यात आली होती. पवार वाडी पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या कुकर्मामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की, या प्रकरणाचा खरी मास्टरमाइंड अजूनही सावलीत आहे का?
या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे, आणि आरोपींच्या अटकेमुळे तपासाला गती मिळाली आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button