जळगाव जिल्ह्यात फक्त आठ महिन्यांत 144 शेतकऱ्यांनी घेतला आत्महत्त्यांचा मार्ग

जळगाव : जळगाव जिल्हा राज्यात मुख्यत्वे राजकारण, केळी आणि कापूस यासाठी ओळखला जातो. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि नंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये 144 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आपले जीवन संपविले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि जुलै महिन्यात अनुक्रमे 23, 29 आणि 23 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.
जळगाव जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन, तूर, केळी, सूर्यफूल आणि गहू हे प्रमुख पीके लागवड केली जातात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून केळीचे दर घसरल्यामुळे केळी शेती पूर्णतः तोट्याची ठरली आहे. कापसाच्या दरात सलग घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. परिणामी, जीवनयात्रा संपविण्याचे प्रकरण वाढत चालले आहे.
सरकारकडून मदतीसाठी सुमारे 68 शेतकरी पात्र ठरले आहेत, तर 58 अपात्र ठरलेले आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यातील 16 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या या संकटामुळे स्थानिक प्रशासन आणि नेत्यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची प्रतिक्रिया आहे.
याबरोबरच जळगावमध्ये काही आर्थिक फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. अलीकडेच 36 लाख 39 हजार रुपयांच्या मुग डाळ खरेदीत फसवणूक उघड झाली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसऱ्या घटनेत जळगावमध्ये जमीन अधिग्रहणाच्या व्यवसायात 53 लाख 40 हजार रुपयांच्या फसवणुकीचा प्रकरण समोर आले आहे. यामध्येही दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणांचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील, तसेच API गणेश फड, रातीलाल पवार आणि निलेश सूर्यवंशी करत आहेत.



