Latest NewsMaharashtraSolapur

सोलापुरात मुसळधार पावसाने थैमान – नदी-नाले तुडुंब, अनेक गावांचा संपर्क तुटला

सोलापूर – गेल्या २४ तासांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील घरं आणि रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक भागांत २ ते ३ फूट पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर आणि शेळगी परिसर पाण्यात बुडाले आहेत. घरगुती साहित्य, विजेची उपकरणे पाण्यात भिजून खराब झाली आहेत. अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले, तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो एकर शेती जलमय झाली.

या मुसळधार पावसामुळे वागदारी परिसरातील गावांचा बाहेरील संपर्क तुटला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक गाड्या बंद पडल्या, दोनचाकी वाहनधारक अक्षरशः पाण्यात अडकले.

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मित्र नगर व शेळगी परिसराची पाहणी केली असता नागरिकांनी महापालिकेच्या भोगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी निचरा व्यवस्थेच्या अभावामुळे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते, तरी ठोस नियोजन का केले जात नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या शहरातील काही भागांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांत आणखी पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button