२० राज्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई/पुणे : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीस महाराष्ट्रासह देशभरात पावसाची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ऑगस्टमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस सप्टेंबरमध्येही थांबण्याचे नाव घेत नाही. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ११ सप्टेंबर गुरुवारी देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
अंदाजानुसार ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेश, मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भाग, उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील परिसर, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटकच्या उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल, सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील विदर्भातील काही भागांत व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय अंदमान-निकोबार, बिहार, कर्नाटकच्या काही भाग, झारखंड, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये ३०–४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे व विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमधील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे हवामान खात्याने सूचित केले आहे.



