Latest News

शिष्यवृत्ती धोरणात बदल; विद्यार्थी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्रीचा महत्त्वाचा संदेश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. राज्यातील सामाजिक न्याय, विशेष सहाय्य आणि आदिवासी विकास विभागाने आर्थिक वर्षाची तरतूद आणि वितरणाचे कालबद्ध नियोजन करून राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणे शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

🏛️ माहेड बैठकीत महत्त्वाचे निर्णय

राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) च्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालय स्थळबिंदू निश्चितीवर चर्चा करण्यात आली. पंचवार्षिक आराखडा 2024–2029 अंतर्गत, २,८१९ स्थळबिंदू मंजूर केले गेले, ज्यापैकी ७३९ महाविद्यालये पात्र ठरली आणि त्यापैकी ५९३ महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आली.

बैठकीत नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली (New College Permission System – NCPS) या ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटनही करण्यात आले. इच्छुक संस्था https://htedu.maharashtra.gov.in/NCPS या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील.

🎓 शिष्यवृत्ती आणि अभ्यासक्रम सुधारणा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. विद्यापीठ स्तरावर समिती गठीत करून नवीन समाजकार्य महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्याबाबत तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, कुशल व काळानुरूप अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. AICTE, UGC, BCI आणि NCTE मान्यता मिळालेल्या अभ्यासक्रमासंबंधी अन्य विभागांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर समिती गठीत करून उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण अंतर्गत अभ्यासक्रम तयार करावे, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

🏥 वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मान्यता

ज्या महाविद्यालयाचे नॅक मानांकन ‘अ’ आहे अशा निवडक खासगी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यास सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी माहिती दिली, ज्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी समाधान व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button