माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘ही आत्महत्या नाही, घातपातच’ असा नातेवाईकांचा दावा; नर्तिका पूजा गायकवाड चर्चेत

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली, तरी आता या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाशी जोडली गेलेली नर्तिका पूजा गायकवाड सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मृतदेह कारमध्ये, डोक्यात गोळी – आत्महत्या की हत्या?
गोविंद बर्गे (वय 34) यांचा मृतदेह 8 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका कारमध्ये आढळून आला. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. पोलिसांनी ही आत्महत्येची शक्यता मानली असली तरी, नातेवाईक व गावकऱ्यांच्या मते हे एक पूर्वनियोजित खून आहे.
प्रेमात पडले होते गोविंद, कोण आहे पूजा गायकवाड?
या प्रकरणात गोविंद बर्गे यांचा संबंध एका 21 वर्षांच्या नर्तिकेशी असल्याची माहिती समोर आली आहे. या नर्तिकेचं नाव पूजा देविदास गायकवाड असून ती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी आहे. पूजा थापडीतांडा येथील कलाकेंद्रात नृत्य सादर करते, आणि याच ठिकाणी तिची गोविंद बर्गेंशी ओळख झाली होती. हळूहळू ही ओळख प्रेमसंबंधात बदलली.
गोविंद यांनी तिच्यावर लाखोंचे खर्च केले होते. मोबाईल, सोन्याचे दागिने आणि महागड्या भेटवस्तू त्यांनी तिला दिल्या होत्या.
मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या रील्सवर संशय
पूजा गायकवाड सोशल मीडियावर सक्रिय आहे. गोविंद यांच्या मृत्यूपूर्वीच्या दिवशीच तिने तीन रील्स पोस्ट केल्या होत्या, त्यातील एक झांझरिया गाण्यावर नृत्य करताना होती. त्यामुळे या पोस्ट्सही आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
“5 एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर कर…” – पूजाचे मागणे
पोलिस तपासात असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, पूजाने काही दिवसांपूर्वी गोविंद यांच्याकडे 5 एकर जमीन आपल्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली होती. गोविंद यांनी नकार दिल्यानंतर पूजाने त्यांच्याशी संवाद तोडला. यामुळे भावनिक धक्का बसलेल्या गोविंद यांना ही परिस्थिती सहन झाली नसावी, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
नर्तिकेची चौकशी सुरू; नातेवाईकांचा खळबळजनक आरोप
गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर पोलीसांनी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे, गोविंद यांच्या कुटुंबीयांचा आणि लुखामसला गावातील सरपंचांचा दावा आहे की:
“ही आत्महत्या नसून ब्लॅकमेलिंग करून खून करण्याची शक्यता आहे. पूजाने त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला होता. तिच्या वागणुकीमुळेच गोविंद यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, किंवा त्यांना फसवून मारण्यात आले.”
गोविंद बर्गे – कुटुंबवत्सल आणि यशस्वी व्यावसायिक
गोविंद बर्गे हे माजी उपसरपंच असून, प्लॉटिंग व रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते. ते विवाहित होते आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गावात त्यांची चांगली प्रतिमा होती. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गावात दुःखाचं व आक्रमशाखळबळचं वातावरण आहे.
पोलिसांचा तपास सुरू
सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळाची तपासणी, फॉरेन्सिक रिपोर्ट, मोबाईल चॅट्स आणि पूजाचे सोशल मीडिया पोस्ट्स याचा बारकाईने तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण फार गुंतागुंतीचे असून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशी आवश्यक असल्याचे सांगितले आहे.



