“आजोबा, आम्हाला टेस्ला नको, फक्त शाळेत जायला एसटी पास मोफत करा” — ग्रामीण विद्यार्थ्यांचं भावनिक पत्र परिवहनमंत्र्यांना

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी खास भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेतल्याच्या बातमीवरून सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चांगलीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या वतीने ‘छात्र भारती’ या विद्यार्थी संघटनेने सरनाईक यांना एक भावनिक आणि थेट पत्र लिहित आपली व्यथा मांडली आहे.
या पत्राचा मथळाच बोलका आहे —
“आजोबा, आम्हाला टेस्ला नको, फक्त शाळेत जायला एसटी पास मोफत करा.”
टेस्ला गिफ्टवरून टीका, आणि विद्यार्थ्यांची वेदना
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी तब्बल 65 लाख रुपये किंमतीची टेस्ला कार विकत घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. त्यावर अभिनेता अस्ताद काळे यानेही रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत सरनाईकांवर टीका केली होती.
आता या पार्श्वभूमीवर छात्र भारतीने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगणारे खुले पत्र लिहून समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले आहे.
भर पावसात उतरवलेला विद्यार्थी
या पत्रात 19 ऑगस्ट 2025 रोजी घडलेली एक वेदनादायक घटना नमूद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील उनपदेव-अडावद मार्गावर पाचवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थी बादल राजाराम बारेला याला, पास संपल्यामुळे एसटी बसमधून भर पावसात उतरवण्यात आले. हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालत घरी पोहोचला.
छात्र भारतीने या घटनेचा संदर्भ देत विचारले आहे की, “टेस्ला कार देणाऱ्या आजोबांनी एका गरीब विद्यार्थ्याच्या अशा अपमानावर कारवाई का केली नाही?”
पत्रातील ठळक मागण्या:
एसटी बस पास सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत करावेत.
विद्यार्थ्यांना बसमधून उतरवणे थांबवावे आणि त्यांना मानवी वागणूक द्यावी.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढण्यामागे ही अपमानास्पद वागणूकही जबाबदार आहे.
परिवहन मंडळाला स्पष्ट आणि सक्त आदेश द्यावेत.
“फक्त नातवाचेच नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांचेही प्रेम ओळखा”
छात्र भारतीच्या पत्रात सरनाईक यांना उद्देशून म्हटले आहे:
“आपण आपल्या नातवासाठी टेस्ला घेतली, त्याचे आम्हालाही कौतुक वाटते. मात्र, आपले खाते पाहता आपल्या जबाबदारीत संपूर्ण राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा प्रवासही येतो. त्यांच्या वाट्याला टेस्ला नाही, पण निदान सुरक्षित आणि सन्मानजनक एसटी प्रवास तरी मिळावा.”
पत्रावर स्वाक्षऱ्या
या खुल्या पत्रावर छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले, कार्याध्यक्ष अनिकेत घुले, संघटक सचिन काकड आणि युवती संघटक दीप्ती शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



