अकोल्यातील हॉस्पिटल पार्किंगमध्ये उभ्या कारला अचानक भीषण आग

अकोला – रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी ही घटना घडली. नेहमीप्रमाणे पार्किंगमध्ये गाड्या उभ्या होत्या. त्याच वेळी एका चारचाकी वाहनातून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता त्याला भीषण आग लागली. घाबरलेल्या लोकांनी तातडीने गाडी बाहेर रस्त्यावर काढली आणि इतर गाड्यांना सुरक्षित केले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी बाहेर आणताच ती अक्षरशः धगधगून जळू लागली आणि काही वेळातच पूर्ण खाक झाली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्यावेळीपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, तीव्र उष्णता आणि उमस यामुळे वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर काही वेळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.



