अर्धापूर वस्तीगृहातील जेवणात अळ्या; विद्यार्थ्यांचा संताप

अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी गंभीर तक्रार केली आहे. वस्तीगृहात मिळणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आला असून, विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, रोजचं जेवण हे निकृष्ट दर्जाचं असतं. जेवणाचा दर्जा एवढा खालावला आहे की आता थेट अळ्या निघाल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली असून, संबंधित वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात असा उद्देश असतो. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी अपुऱ्या सोयी, निकृष्ट दर्जाचं जेवण आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्रस्त आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला असून, “आम्ही शिक्षणासाठी आलो आहोत, पण इथे आरोग्य धोक्यात आलं आहे” अशी हाक विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे.



