मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या – जरांगेंचा इशारा

वडीगोद्री : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा ठाम इशारा दिला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास आंदोलनाचा कठोर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंतरवली सराटी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी उपलब्ध झाल्यास तात्काळ प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा दसरा मेळाव्यात आमची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.”
मुंबईतील आंदोलनानंतर गावात प्रथमच परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे औक्षण, फुलांची व गुलालाची उधळण करत स्वागत केले. या स्वागताने भावूक झालेल्या जरांगे पाटलांनी सरकारसमोर आपली भूमिका मांडली.
ते पुढे म्हणाले की, समाजाने दोन वर्षांच्या संघर्षातून ९६ टक्के यश मिळवले आहे. आता उर्वरित प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
सरकारने वेळेत निर्णय घ्यावा, अन्यथा गोंधळ टाळणे कठीण होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, “१७ सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आले पाहिजे. अन्यथा आम्हाला पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल,” असेही ते म्हणाले.



