दसरा-दिवाळी सणासाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; विशेष गाड्यांवर आरक्षण सुरू

सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने दसरा, दिवाळी, छटपूजा आणि नवरात्रोत्सवासाठी विशेष ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरी-व्यवसायाच्या कारणास्तव आपल्या गावी प्रवास करणाऱ्या लोकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे आणि बसेसमध्ये गर्दीमुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या; आता या विशेष गाड्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर होईल.
नागपूर–पुणे विशेष एक्सप्रेस
गाडी क्रमांक 01209: नागपूर–पुणे दरम्यान, 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 07:40 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पुण्यात पोहोचेल.
गाडी क्रमांक 01210: पुणे–नागपूर दरम्यान, 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान, दर रविवारी दुपारी 03:50 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता नागपूरला पोहोचेल.
या गाड्यांमध्ये वातानुकूलित ३-टियर, शयनयान, सामान्य द्वितीय आसन तसेच गार्ड ब्रेक व्हॅन अशा संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. या विशेष गाड्यांना उरुळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशनवर थांबे मिळणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस
गाडी क्रमांक 02139: 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान, प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री 12:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 03:30 वाजता नागपूर पोहोचेल.
गाडी क्रमांक 02140: 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान, प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून दुपारी 01:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) पोहोचेल.
या साप्ताहिक विशेष सेवांमुळे प्रवाशांना गर्दीपासून मुक्त, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी लवकर तिकीट आरक्षण करून आपल्या सणासुदीच्या प्रवासाची तयारी करावी, असे रेल्वे प्रशासनाचे आवाहन आहे.



