अमरावतीत पुन्हा वाढले अतिक्रमण; ‘मिशन फ्री फुटपाथ’वर प्रश्नचिन्ह

अमरावती शहरात काही महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या ‘मनपा मिशन फ्री फुटपाथ’ला पुन्हा गती मिळणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला अतिक्रमणमुक्तीची जोरदार कारवाई झाली होती, मात्र कालांतराने ही मोहीम मंदावली असून अनेक ठिकाणी दुकाने पुन्हा रस्त्यावर उतरली आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच नवाथे चौपाटीवर मनपा आणि वाहतूक विभागाने एकत्रित कारवाई करून ५० हून अधिक दुकाने आणि अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या हटवल्या होत्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली होती आणि अपघाताचा धोका कमी झाला होता.
पण आज पुन्हा त्याच भागात सुमारे २५ दुकाने रस्त्यावर थाटली गेली आहेत. ग्राहकांच्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
मनपाने केलेल्या कारवाईनंतरदेखील दुकाने पुन्हा रस्त्यावर येत असल्याने हे प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. आता अतिक्रमण विभाग यावर कोणती पावले उचलतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



