अमरावतीत आज बाप्पांचं भव्य विसर्जन! पोलीस दल सज्ज, मोठा बंदोबस्त

अमरावती शहरात गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस आज आहे. तब्बल १७१ सार्वजनिक गणेश मंडळांचे बाप्पा आज निरोप घेणार आहेत. या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तालयाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र चावरिया यांनी स्वतः विसर्जन मार्गांची आणि स्थळांची पाहणी केली.
अमरावती शहर यंदा गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघालं आहे. शहरात एकूण ५९० सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी काही मंडळांनी यापूर्वीच विसर्जन केले आहे. आज, ७ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १७१ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. येत्या काही दिवसांत, ८, ९, १० आणि ११ सप्टेंबर रोजी देखील विसर्जन प्रक्रिया सुरू राहणार आहे. या गर्दीच्या दिवसांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र चावरिया यांनी स्वतः मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळांची पाहणी केली आहे. त्यांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या बंदोबस्तासाठी तीन पोलीस उपायुक्त, चार एसीपी, २५ पोलीस निरीक्षक, ७० एपीआय आणि पीएसआय, ५,३५० अंमलदार, आरसीपी, क्यूआरटी प्लाटून, एसआरपीएफ कंपनी आणि ५०० होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे, तसेच संवेदनशील वस्त्यांवर फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १४ सीआर मोबाईल व्हॅन, १० दामिनी पथके, बीट मार्शल आणि डायल ११२ ची वाहने २४ तास गस्त घालणार आहेत. विसर्जनासाठी शहरात छत्री तलाव, नेमाणी गोडाऊन, रेवसा, कौंडण्यपूर, हरतोटी, आणि अनेक नद्या व तलाव यांसारखी विविध स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन नागरिकांना शांततेत आणि सहकार्य करून विसर्जन प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करत आहे.



