क्लासवरून परतलेल्या आयुष आंदेकरचा पार्किंगमध्ये गोळ्या झाडून खून

पुणे :पुण्यात काल (शुक्रवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठ परिसरात धक्कादायक खूनाची घटना घडली. बंडू आंदेकर यांचा जावई आणि वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (१८) याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद ऊर्फ आयुष हा नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभा असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आयुषचा जागीच मृत्यू झाला. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ठिकाणी गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून खुनामागील कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले आहेत. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, आज नाना पेठेत तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली. तसेच पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



