अकोल्यात राजेंद्र पातोडेंच्या मुलावर हल्ला, घरफोडी-कार जाळली

अकोला शहरातील आदर्श कॉलनी परिसरात शुक्रवारी झालेल्या घटनेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव आणि प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर हल्ला झाला. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातोडे यांच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या जमावाकडून घरातील वस्तूंची तोडफोड झाल्याचे दिसून आले, तसेच घराच्या अंगणात उभी असलेली एक कारही पेटवली गेली.
याबाबत माहिती मिळताच खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून,परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



