चालत्या रेल्वेत चढणे जीवावर बेतले

धक्कादायक घटना धामणगाव रेल्वे स्टेशनवर घडली आहे. कोल्हापूर-गोंदिया एक्सप्रेसमध्ये पेंट्री साइडर म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद शकील नूर मोहम्मद (वय ४८) हे पाणी पिण्यासाठी स्टेशनवर उतरले होते.
दरम्यान, गाडी सुटल्याने ते पुन्हा चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला. क्षणभरातच ते रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचा एक पाय गुडघ्याखालून पूर्णपणे वेगळा झाला, तर दुसऱ्या पायाचा पंजा गंभीररीत्या चिरडला गेला.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अमर वानखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. काही तरुणांच्या मदतीने ॲम्बुलन्सची प्रतीक्षा न करता शकील यांना स्ट्रेचरवर उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा चालत्या रेल्वेत चढण्याचा धोका अधोरेखित झाला आहे. क्षणिक निष्काळजीपणा जीवनभराची वेदना देऊ शकतो, हे या अपघातातून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा धोकादायक प्रयत्नांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



