तलावाच्या खोदकामात सापडले डायनासोर कालखंडातील अवशेष; राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतातील दुर्मिळ शोध

जैसलमेर, राजस्थान : भारताच्या भूमीत आणखी एक ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावात एका तलावाच्या खोदकामादरम्यान ज्युरासिक कालखंडातील सजीवाचे जीवाश्म स्वरूपातले अवशेष सापडले आहेत. संशोधकांच्या मते हे अवशेष Phytosaur नावाच्या अर्ध-जलीय प्राण्याचे आहेत, जो सध्याच्या मगरीसारखा दिसणारा प्राणी होता.
हे काय आहे Phytosaur?
Phytosaur हे सुमारे 200 ते 229 मिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात असणारे अर्ध-जलीय प्राणी होते. ते मगरीसारखे दिसले तरी त्यांचे मगरांशी थेट नाते नाही. ते त्यांच्या लांब टोकदार तोंडामुळे आणि जलाशयांमध्ये राहण्याच्या सवयींमुळे ओळखले जातात. भारतात सापडलेले हे अवशेष आतापर्यंतचे सर्वात चांगले संरक्षित Phytosaur जीवाश्म मानले जात आहेत.
कुठे सापडले हे अवशेष?
या जीवाश्मांचा शोध जैसलमेरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघा गावात, लाठी फॉर्मेशन नावाच्या भौगोलिक संरचनेत लागला. तलावाच्या खोदकामादरम्यान स्थानिक गावकऱ्यांना काही वेगळ्या प्रकारचे अवशेष दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. अधिक उत्खननात अवशेषांशिवाय प्राण्याची अंडी देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे.
संशोधनाचे नेतृत्त्व कोणाचे?
या संशोधनाचे नेतृत्त्व डॉ. नारायणदास इन्खिया, राजस्थानच्या पाणी विभागाचे वरिष्ठ हायड्रोजिओलॉजिस्ट, यांनी केलं. स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधत त्यांनी जैविक पुराव्यांचे बारकाईने निरीक्षण केलं आहे.
हे संशोधन का महत्त्वाचे?
भारतात डायनासोर कालखंडाशी संबंधित जीवाश्म फारच मर्यादित प्रमाणात सापडले आहेत.
हे अवशेष ज्युरासिक युगाच्या सुरुवातीच्या काळातील असल्यामुळे ते संशोधनाच्या दृष्टिकोनातून फारच मौल्यवान मानले जात आहेत.
यामुळे राजस्थानमधील लाठी फॉर्मेशन क्षेत्राला जागतिक पुरातत्व-जीवाश्म नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळू शकते.
आता पुढे काय?
संशोधकांच्या मते या भागात अशा अनेक पुरातन अवशेषांची शक्यता आहे. या शोधामुळं पुढील उत्खननाला वेग येण्याची शक्यता आहे. भारतातील जीवाश्मशास्त्राला चालना देणारा हा शोध भविष्यात आणखी अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करू शकतो.



