AchalpurLatest NewsMaharashtra

टोल टॅक्सवरून अचलपूरमध्ये जनतेचा संताप; २० वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार टोल वसुली

अचलपूर : अचलपूर ते चांदूरबाजार दरम्यानच्या महामार्गावर लवकरच टोल टॅक्स सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, हा टोल मागील २० वर्षांपासून बंद होता आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात याची अंमलबजावणी रोखली गेली होती. मात्र, सध्या सत्तेवर असलेले भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यकाळात हा टोल पुन्हा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या नव्याने सुरू होणाऱ्या टोलमुळे अचलपूरहून चांदूरबाजारकडे दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. टोल दरपत्रकानुसार कार, ट्रक, आणि मोठ्या वाहनांवर विशिष्ट दर आकारण्यात येणार असून, शेतमालाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ताज्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्र व राज्य सरकारचे मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना या टोलमधून सूट देण्यात आली आहे. मात्र, या सूटीतून सामान्य जनतेचा, विशेषतः शेतकऱ्यांचा, अपवाद करण्यात आला आहे, ज्यामुळे असंतोष अधिक तीव्र झाला आहे.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यातून या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काही संघटना आणि राजकीय पक्षांनी यावर आंदोलनाची चेतावणी दिली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, “ज्यांनी रस्ता वापरायचा नाही, त्यांना सूट मिळते आणि जे रोजच्या गरजेसाठी या मार्गाचा वापर करतात, त्यांच्यावर आर्थिक बोझा टाकला जातो.”

आता येणाऱ्या काळात राजकीय पक्ष व स्थानिक प्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात आणि जनता आपला विरोध कोणत्या प्रकारे नोंदवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button