जुनी अमरावती तहसीलच्या विहिरीत सापडला अनोळखी मृतदेह

अमरावती : अमरावती शहर हादरलं आहे! जुनी अमरावती तहसील परिसरातील विहिरीतून एका ५५ ते ६० वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जुनी अमरावती तहसील परिसरात असलेल्या एका विहिरीतून दुर्गंध पसरत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. नागरिकांनी याबाबत पोलीसांना कळवल्यानंतर, सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. अंदाजे ५५ ते ६० वर्षांचा हा इसम असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह गेल्या तीन ते चार दिवसांपासून विहिरीत पडून असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्यांची माहिती आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला आहे.
या अनोळखी मृतदेहामुळे जुनी अमरावती परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतकाची ओळख पटवून मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.



