खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त; वडगाव राजदी येथे रस्ता रोको आंदोलन

वडगाव राजदी: वडगाव राजदी, वडगाव बाजदी, रामगाव आणि दिपोरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दु#रवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज तीव्र आंदोलन केले. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे गिट्टी क्रेशरचे वाहन दिवसभर या रस्त्यावरून ये-जा करत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या समस्येविरोधात ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन पुकारले.
क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे रस्ता उद्ध्वस्त
रामगाव ते वडगाव राजदी आणि दिपोरीपर्यंतचा रस्ता हा केवळ 10 टन वजनाची क्षमता असलेला आहे, मात्र त्यावर 30 ते 35 टन वजनाचे गिट्टी क्रेशरचे वाहन सतत धावत होते. यामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. या खराब रस्त्यामुळे बस, ऑटो आणि दुचाकी चालवणे धोकादायक बनले असून, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांचा एल्गार, प्रशासनाकडे लक्ष वेधले
या परिस्थितीमुळे संतप्त झालेले नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार अभय घोरपडे, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या एकजुटीमुळेच हे आंदोलन यशस्वी झाले असून, यामुळे प्रशासनाला या समस्येची गंभीर दखल घ्यावी लागली. रस्त्यांची दुरवस्था आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर नियंत्रण, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.



