कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःची आत्महत्या; दोन चिमुकली पोरकी

भोकरदन, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून, त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत दोन लहान निष्पाप बालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
ही धक्कादायक घटना शनिवारी पारध बुद्रुक येथे उघडकीस आली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, समाधान अल्हाट (वय अंदाजे ३०) याने कौटुंबिक वादातून पत्नी कीर्ती अल्हाट (वय अंदाजे २५) हिच्या डोक्यात धारदार पाहरा घालून तिची हत्या केली. त्यानंतर समाधानने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
समाधान आणि कीर्ती यांच्या विवाहाला पाच वर्षे झाली होती. त्यांना स्वामीनी (वय २ वर्षे) आणि रुद्र (वय ५ वर्षे) अशी दोन लहान मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद होत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी, सिल्लोड तालुक्यातील वसई येथे गेली होती, परंतु समाधानने तिला काही दिवसांपूर्वी जबरदस्तीने परत आणले होते.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच, पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेमुळे संपूर्ण पारध गावात हळहळ व्यक्त होत आहे. आई-वडिलांना एकाच वेळी गमावलेल्या त्या दोन लहान निरागस बालकांच्या भवितव्याची चिंता सर्वांनाच सतावत आहे.



