Latest NewsMaharashtra

परतवाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची व्यथा समितीसमोर स्पष्ट – लायब्ररी, रस्ते आणि सोयी-सुविधांचा अभाव

परतवाडा : परतवाडा येथील शासकीय अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या होस्टेलमध्ये राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या १६ आमदारांनी भेट दिली. या दौऱ्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न आणि समस्या थेट समितीसमोर मांडत आपल्या अडचणींना वाचा फोडली.

विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, होस्टेलमध्ये अभ्यासासाठी लायब्ररी उपलब्ध नाही, तसेच खेळण्यासाठी मैदानाचीही कमतरता आहे. यामुळे शैक्षणिक आणि शारीरिक विकासात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय होस्टेलकडे जाणारा रस्ता चिखलमय असून वाहतुकीची कोणतीही सोय नाही, त्यामुळे शिक्षणासाठी दररोजचा प्रवास अधिक त्रासदायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याची मागणीही या वेळी विद्यार्थ्यांनी केली. होस्टेलमध्ये स्थान मर्यादित असल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.

समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा, स्थानिक आमदार केवलराम काळे आणि इतर आमदारांच्या उपस्थितीत ही भेट झाली. विशेष म्हणजे, समितीच्या आगमनापूर्वी होस्टेलमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती, परंतु विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मात्र वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.

आता या भेटीनंतर प्रत्यक्ष काही बदल घडतात का, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button