कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची शिवाजीनगर वसतिगृहाला अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून तत्काळ कारवाईचे आदेश

पुणे : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील शासकीय शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहाला अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या वास्तव्यातील अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आशेचे आणि समाधानाचे वातावरण दिसून आले.
या भेटीदरम्यान मंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून स्वच्छता, जेवणाची गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधांबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वसतिगृहातील सुरक्षेची आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था अधिक चांगली करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छतेसाठी नियमित देखरेख होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही अडथळा येणार नाही, याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांच्या हितासाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल,” असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले.
यावेळी भविष्यातही अशा अनपेक्षित भेटी घेतल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचतील आणि व्यवस्थापन अधिक जबाबदार ठरेल.
शेवटी, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करत मंत्री भरणे यांनी शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास दिला.



