मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना का भेटलो? राज ठाकरेंनी केलं उघड, ‘कबुतरं, हत्ती…’

मुंबई : बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर दुसऱ्यात दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांदरम्यान झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना राज ठाकरेंनी या भेटीमागील कारण उघड केलं आहे. शहर व्यवस्थापनासंदर्भात आपण त्यांची भेट घेतल्याचं राज ठाकरेंनी निवावस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. प्रत्येक शहराचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं आहे.
“गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी काही महत्त्वाच्या विषयांवर बोलत होतो. त्याचा आराखडा मी त्यांच्यासमोर मांडला. टाऊन प्लानिंग माझ्या आवडीचा विषय आहे. एका स्कॉटिश साहित्यिकाचं चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडे लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी देशाचं भविष्य सांगतो. मी यात बदल करत सांगतो की, तुमच्याकडे वाहतुकीची परिस्थिती दाखवा. मी देशाचं भवितव्य सांगतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मुंबई. ठाणे, नाशिक, नागपूर अनेक शहरं जी उभी राहत आहेत तिथे मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपेंटमची कामं उभी राहत आहेत. तिथे अनधिकृत गोष्टीही होत आहेत. आज जिथे 50 माणसं राहत होती तिथे 500 माणसं आली आहेत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या आणि ट्राफिक वाढलं. सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत. 26 जुलैला 900 इंच पाऊस पडला होता, परवा 400 इंच पाऊस पडला. ज्याप्रकारची स्थिती निर्माण झाली त्यावरुन रस्ते कमी, वाहतुकीची व्यवस्था नाही, पार्किंग नाही हे दिसत आहे. याचं उत्तर सापडलं नाही. कबुतरं, हत्ती या गोष्टीत इतके अडकलो आहोत, की मुलभूत समस्यांकडे लक्ष नाही”.
“गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग लॉट उभे करण्याची गरज आहे. लोकांना शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातून, प्रदेशातून लोक आलेत त्यांना या शहरात काय प्रकारची व्यवस्था आहे माहिती नाही. डबल पार्किंग करत असतात. मुख्यमंत्र्याना छोटासा आराखडा दिला आहे. मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्त यांच्यासोबत नियोजित बैठक होती. मी काही नमुने सांगितले,” अशी माहिती त्यांनी दिली.
“सिस्टम लावण्यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात देऊ. जास्ती दंड किंवा जेल याला लोक घाबरतात. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणं बंद झालं आहे. वाहतुकीसाठीही असं काही झालं पाहिजे. नो पार्किंगचे बोर्ड पाहत नाहीत आणि गाड्या पार्क करतात. मी आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्तांनाही सांगितलं आहे. 2014 ला मी छोट्या मैदानांखाली पार्किंग होऊ शकतं असं सांगितलं होतं. अशा प्रकारच्या अनके गोष्टी करता येऊ शकतात. पार्किंग आणि नो पार्किंग असणाऱ्या फुटपाथना रंग द्यायला हवा. केल्या तर काय प्रकारचा दंड आकारला जाऊ शकतो यावर राज्य सरकार काम करत आहे. मॅपमध्येही नो-पार्किंग दाखवलं जावं. याच्यातून थोडी शिस्त लागेल अशी आशा आहे. दोन चाकी वाहनं सिग्नल पाळत नाहीत. दुपारी 12 वाजताही गाड्या थांबत नाहीत. कायद्याला न जुमानणं यातून शहरं उभ राहणार नाहीत. आपण फार वाईट गोष्टीकडे जाऊ. भविष्यात फार गोंधळ दिसत आहेत, जर उपाययोजना झाल्या नाहीत तर बेशिस्तीतून वेगळ्या गोष्टीतून जाणार. गोष्टी हाताबाहेर गेल्यावर कोणी काही करु शकणार नाही. शहरांचेही काही नियम असतात ते पाळायला हवं,” असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.



