‘हे फार दुर्दैवी ..’, गावसकरांचा अपमान केल्याने रोहित, विराट आणि शुभमन गिलला दिग्गजाने सुनावलं, ‘तुमचं भलं…’

भारतीय क्रिकेटबद्दल जेव्हा कधी बोललं जातं तेव्हा सुनील गावसकरांचं नाव हे नेहमीच आघाडीवर असतं. दिग्गज खेळाडू असणारे सुनील गावसकर यांना भारतीय क्रिकेटपासून वेगळं केलंच जाऊ शकत नाही. एकेकाळी मैदान गाजवणारे गावसकर आता समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटर्सना सल्ला देत असतात, टीका करत असतात. गावसकर नेहमीच आपल्या अनुभवाचा फायदा तरुण खेळाडूंना व्हावा यासाठी मार्गदर्शनासाठी तयार असतात. पण हेदेखील तितकंच खरं आहे की, भारतीय खेळाडू त्यांच्याकडून आधाीप्रमाणे आता फारशी मदत घेताना दिसत नाही. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सेहवाग यांनी अनेकदा गावसकर यांच्याकडून सल्ला आणि मदत घेतली आहे. ज्यामुळे त्यांच्या करिअरला फायदा झाला. पण आताची पिढी वेगळी आहे. खेळाडूंना प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाच्या मदतीने स्वतःचे मार्ग स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतात, याचं मुख्य कारण आयपीएल आहे. दिग्गजांवर अवलंबून राहण्याची प्रथा आता कमी होत चालली आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी गावसकरांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये या मताचे आहेत. कोणताही भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत नसल्याचं गावसकरांच्या माजी सहकाऱ्याला फार वाईट वाटत आहे. त्यांच्याकडे सल्ला मागण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. त्या अर्थाने, 75 वर्षीय घावरी यांना हे विचित्र वाटते की इतर देशांचे क्रिकेटपटू गावस्करची मदत घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
“सुनील गावसकर गेल्या 25 वर्षांपासून समालोचन करत आहेत. त्यांच्या कमेंट्स कोणत्याही तरुण खेळाडूसाठी फार महत्त्वाच्या आहेत. आपलेच खेळाडू त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी जात नाहीत हे फार दुर्दैवी आहे. बाहेरचे खेळाडूही त्यांच्याकडे जातात. शुभमन गिलसह प्रत्येक भारतीय फलंदाजाने त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तो गेला आहे की नाही माहिती नाही. पण नसेल तर नक्की गेलं पाहिजे. जर ते गेले असते तर मीडियात बातमी आली असती की, सुनील गावसकर यांनी विराट कोहली किंवा रोहित शर्मा किंवा शुभमन गिलला सल्ला दिला आहे. पण अशी कोणतीही गोष्ट ऐकण्यात येत नाही,” असं करसन घावरी यांनी विकी ललवानीच्या शोमध्ये म्हटलं.
‘विराट कोहली, रोहित शर्मा यांनी सुनील गावसकरांचा आदर करावा’
रोहित शर्मा आणि गावसकर यांच्यातील वादावरही घावरी यांनी लक्ष वेधलं. काही महिन्यांपूर्वी, काही माध्यमांनी रोहितने बीसीसीआयकडे गावसकरांबद्दल तक्रार दिल्याचं वृत्त दिलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान गावसकर यांनी केलेल्या टिप्पणीविरोधात ही तक्रार होती. याशिवाय, आयपीएलच्या गेल्या हंगामात गावसकर आणि विराट कोहली यांच्यातील तणाव देखील चर्चेत आला होता जेव्हा आरसीबी स्टार विराटच्या स्ट्राईक-रेटवर त्यांनी टीका केली होती. त्यावर भाष्य करताना, घावरी यांनी गावसकर अशा अनादरास पात्र नाहीत आणि त्यांची टीका सकारात्मकतेने घेतली पाहिजे असा आग्रह धरला.
‘हा मूर्खपणा आहे’
“हा मूर्खपणा आहे. तुम्ही रोहित शर्मा किंवा विराट कोहली असाल, पण या महान खेळाडूचा आदर करायला हवा. कारण जर ते काही बोलत असतील किंवा सल्ला देत असतील तर ते तुमच्या भल्यासाठी आहे. रवी शास्त्री हे खुल्या मनाचे आहेत. जेव्हा त्यांना एखाद्यावर टीका करायची असते तेव्हा ते करतात. पण सुनील ती वेगळ्या पद्धतीने करतात. ते रवी शास्त्रींपेक्षा वेगळ्या पद्धतीने बोलण्यासाठी ओळखले जातात,” असं ते म्हणाले.
1) सुनील गावसकर यांनी कर्णधार म्हणून काय कामगिरी केली?
सुनील गावसकर यांनी १९७८-१९७९, १९७९-१९८३ आणि १९८४-१९८५ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या कर्णधारपदाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध यश मिळवले. त्यांनी शिस्तबद्ध नेतृत्वाने संघाचा आत्मविश्वास वाढवला.
2) सुनील गावसकर यांना कोणते पुरस्कार मिळाले?
अर्जुन पुरस्कार: क्रिकेटमधील योगदानासाठी.
मुंबई क्रीडा पत्रकार संघटना जीवनगौरव पुरस्कार: ११ डिसेंबर २०१६ रोजी.
इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरील एका स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
3) सुनील गावसकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काय कामगिरी केली?
गावसकर यांची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी कसोटीइतकी प्रभावी नव्हती, परंतु त्यांनी १०८ सामन्यांत ३,०९२ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि २७ अर्धशतके समाविष्ट आहेत. १९८७ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी ८८ चेंडूंमध्ये शतक ठोकले, ज्यामुळे त्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला.



