Latest NewsMaharashtra

‘लाडकी बहीण’च्या यशानंतर आता शिंदेंकडून ‘लाडकी सून’ योजनेची घोषणा; जाणून घ्या तपशील

विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लाडकी सून’ योजनेची घोषणा केली आहे. स्वत: एकनाथ शिंदेंनी या योजनेची घोषणा केली असून राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

योजना कधीही बंद होणार नाही
ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रविवारी शहरातील गडकरी रंगायतन येथे ‘खेळ मंगळागौरीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहून आपण लाडक्या बहिणींशी संवाद साधल्याचं एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याच पोस्टमध्ये पुढे एकनाथ शिंदेंनी, “राज्यातील महायुतीचे सरकार हे लाडक्या बहिणींनी आणलेले सरकार आहे. त्यामुळेच मी कालही म्हणालो लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची दांडी, त्यामुळे तुमच्यासाठीच आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली आणि ती यशस्वी करून दाखवली. आज कुणी कितीही आणि काहीही म्हणाले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही,” असा शब्द महिला वर्गाला दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींनी भक्कम साथ द्यावी
“वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी एकदा शब्द दिला की कधीही फिरवायचा नाही अशी शिकवण दिली होती. त्यामुळेच आम्ही तुम्हाला दिलेला शब्द खरा करून दाखवत तुमच्या खात्यावर योजनेचे पैसे दिले असे आवर्जून नमूद केले. आपल्यावर विश्वास ठेवून आज लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आपल्या पक्षात येत असून विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींनी भक्कम साथ द्यावी,” असे आवाहन यावेळेस एकनाथ शिंदेंनी केले.

हेच शिवसेनेचे वचन
“आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान हाती घेणार आहे,” असं शिंदेंनी नमूद केले.

त्या ठिकाणी मदत मिळेल
या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी, “आपण अत्याचाराच्या घटना पाहतो. शिवसेना कायम आपल्या लाडक्या बहि‍णींसाठी उभी राहते. आम्ही लाडकी सून, सुरक्षित सून हे अभियान सुरु केलं आहे. लाडक्या सुनेचं संरक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी महिला आघाडीच्या रणरागिणी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील,” असं सांगितलं.

…म्हणून ठाण्यातून सुरुवात
“धर्मवीर आनंद दिघेंच्या काळात जेव्हा असे अन्याय झाले त्यावेळेस आनंद दिघेंनी तात्काळ मदत करायचे आणि दिलासा द्यायचे. त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करायचे. म्हणूनच आम्ही आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमातून या मोहिमेला सुरुवात केली आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तक्रारी करता येतील. या तक्रारींची गुप्तता पाळली जाईल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

या क्रमांकावर करा फोन
अन्याय झाला आहे तिथे न्याय देण्याचं काम शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. तसेच त्यांनी सध्या या योजनेअंतर्गत मदत हवी असल्यास 8828862288 आणि 8828892288 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुप सुरु होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडक्या सासूंचाही योग्य सन्मान होईल
‘लाडक्या सुनांचा प्रश्न सोडवण्यासोबतच लाडक्या सासूंचाही योग्य सन्मान होईल’, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. या योजनेची राज्य जबाबदारी ठाणे जिल्हा महिला संघटिका आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे असेल असंही शिंदेंनी सांगितलं.

‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’
“महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘लाडकी सून’ योजना काय आहे?
‘लाडकी सून’ योजना ही शिवसेना शिंदे गटाने सुरू केलेली एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक छळ सहन करणाऱ्या सुनांना तात्काळ मदत आणि संरक्षण देणे आहे. ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यात जाहीर केली. योजनेचा मुख्य हेतू सुनांना सन्मानाने वागणूक मिळवून देणे आणि घरगुती हिंसाचाराला आळा घालणे आहे.

‘लाडकी सून’ योजनेची घोषणा कोणी आणि कधी केली?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यात ‘खेळ मंगळागौरीचा’ या कार्यक्रमात ‘लाडकी सून’ योजनेची घोषणा केली.

या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश सासरी अन्याय, अत्याचार किंवा छळ सहन करणाऱ्या सुनांना तात्काळ मदत, संरक्षण आणि न्याय मिळवून देणे आहे. याशिवाय, चांगल्या सासूंचा सन्मान करून सासू-सून यांच्यातील नाते दृढ करणे आणि समाजात सकारात्मक संदेश पाठवणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.

‘लाडकी सून’ योजनेची सुरुवात का आणि कुठून झाली?
या योजनेची सुरुवात ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातून झाली, कारण दिघे यांनी आपल्या काळात अन्यायग्रस्तांना तात्काळ मदत आणि न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यांच्या प्रेरणेतून एकनाथ शिंदे यांनी ही मोहीम ठाण्यातून सुरू केली.

या योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?

हेल्पलाइन नंबर: सुनांना अत्याचार किंवा छळ झाल्यास तक्रार नोंदवण्यासाठी 8828862288 आणि 8828892288 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल. लवकरच ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होईल.

गोपनीयता: तक्रारींची पूर्ण गुप्तता पाळली जाईल.

समुपदेशन: सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तो अयशस्वी झाला तर शिवसेना योग्य कारवाई करेल.

शिवसेना शाखा: राज्यभरातील शिवसेना शाखा आणि कार्यालयांमार्फत पीडित सुनांना मदत पुरवली जाईल.

या योजनेत सासूंची भूमिका काय आहे?
या योजनेत केवळ पीडित सुनांना मदत करण्यावरच भर नाही, तर चांगल्या सासूंचा सन्मानही केला जाणार आहे. यामुळे सासू-सून यांच्यातील नाते सुधारेल आणि समाजात सकारात्मक संदेश जाईल.

‘लाडकी सून’ योजनेचा आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा काय संबंध आहे?
‘लाडकी बहीण’ योजनेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून दिले. या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी सून’ योजना जाहीर केली, जी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आणखी एक पाऊल आहे. एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना कधीही बंद होणार नाही, असा शब्दही दिला आहे.

सुनांना कशा प्रकारे मदत मिळेल?
सासरी अत्याचार किंवा छळ सहन करणाऱ्या सुनांना हेल्पलाइन नंबरद्वारे तक्रार नोंदवता येईल. शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी तात्काळ मदतीसाठी पोहोचतील. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे समेटाचा प्रयत्न होईल, अन्यथा योग्य कारवाई केली जाईल. तक्रारींची गुप्तता पाळली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button