पावसाने पीक उद्ध्वस्त, कर्जाने ग्रासलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी, भुसणी येथील शेतकरी खंडू देवकते यांच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला. टावरजा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांच्या दोन एकर सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आणि हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शेतातील हे भयानक दृश्य पाहून देवकते मानसिक तणावाखाली आले. ‘आता आपलं कसं होणार, कर्ज कसं फेडायचं?’ या विवंचनेत त्यांनी सकाळी ११ वाजता स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेनंतर, लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोयकर यांनी औसा तहसीलदारांशी संपर्क साधून कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली. तहसीलदारांनी शक्य ती सर्व मदत त्वरित करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये खंडू देवकते यांचे वडील रामकिसन देवकते यांचे निधन झाल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आता त्यांच्या आत्महत्येमुळे हे कुटुंब पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अभिमन्यू साठे नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली होती. या दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



