Crime NewsJalnaLatest News

जालना: स्वातंत्र्य दिनी पोलिसांकडून आंदोलकाला लाथ, शहरात तणाव..

जालना: देशात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका आंदोलकाला डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी लाथ मारल्याचा आरोप समोर आला आहे.

गेल्या महिन्याभरापासून अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत उपोषण करत आहेत. आज पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता, आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.


आत्मदहनाचा प्रयत्न आणि पोलीस कारवाई

ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याच वेळी एका आंदोलकाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येऊन एका आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याचे दृश्य समोर आले.

या घटनेमुळे आंदोलक गंभीर जखमी झाले नसले तरी, जालन्यात मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


प्रशासकीय कारवाईवर प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या या कृतीवर लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस यांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेचे संपूर्ण सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button