अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘घर घर तिरंगा’ अभियान आणि तंबाखूमुक्तीची शपथ

अमरावती: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला परिचारिका, डॉक्टर, टेक्निशियन, आणि रुग्णालयातील इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ‘घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात आला.
ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी तिरंग्याला सामूहिकरित्या सलामी देत स्वातंत्र्य दिनाचा गौरव केला. याचवेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण संकल्प केला. त्यांनी तंबाखूमुक्त जीवन जगण्याची सामूहिक शपथ घेतली.
या शपथविधी दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांनी भविष्यात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याचा निर्धार केला आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्राधान्य देण्याचे वचन दिले. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण समाजामध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि इतरांनाही तंबाखूमुक्त जीवनासाठी प्रेरणा देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. या उपक्रमामुळे आरोग्य आणि स्वच्छ जीवनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



