अमरावती: ‘उमेद’ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा ‘प्रीती देशमुख हटाव’ एल्गार

अमरावती: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) अंतर्गत ‘उमेद’ योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यावर मानसिक छळाचा आरोप करत सोमवारी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. जवळपास १२० हून अधिक कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन करत देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न आणि वाढलेला संताप
हे आंदोलन सुरू होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, प्रकल्प संचालक देशमुख यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गेलवार यांनी एक आठवड्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधील संताप अनावर झाला असून, उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, देशमुख यांच्यामुळे कामाचं वातावरण बिघडलं आहे आणि यामुळे अनेक कर्मचारी त्रस्त आहेत.
राजकीय नेत्यांना निवेदने, तरीही कारवाई नाही
या गंभीर आरोपांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार, आमदार रवी राणा, खासदार बळवंत वानखडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या प्रकरणी निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे “प्रीती देशमुख यांची पाठराखण नेमकी कोण करत आहे?” असा सवाल आता कर्मचारी विचारत आहेत.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणी तात्काळ कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन केवळ अमरावतीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले जाईल. या आंदोलनामुळे आता प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील काळात यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



