अमरावती,पर्युषण पर्वानिमित्त जैन समाजाची आयुक्तांकडे मांसाहार बंदीची मागणी…
अमरावती: अमरावतीमध्ये २० ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या पर्युषण पर्वासाठी समस्त जैन समाजाने एक महत्त्वाची मागणी केली आहे. जैन समुदायाने अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन देऊन या आठ दिवसांच्या काळात शहरात मांसाहार विक्री आणि कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्याची विनंती केली आहे.
पर्युषण पर्व आणि अहिंसेचा संदेश
जैन धर्मातील पर्युषण पर्व हे धर्म, तप आणि संयमाचे प्रतीक मानले जाते. या पावन काळात अहिंसेचे तत्त्व पाळले जावे, यासाठी जैन श्वेताम्बर समुदायाने हा पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात, यापूर्वी जारी झालेल्या सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणीही जैन समाजाने केली आहे.
अनेक संस्थांचा एकत्र येऊन पुढाकार
हे निवेदन ओसवाल नवयुवक संघ, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. या उपक्रमात श्री ओसवाल संघ, श्री जैन श्वेताम्बर मित्र मंडळ, श्री दादावाडी संस्था, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री अंबापेठ स्थानकवासी संघ, आणि श्री जैन श्वेताम्बर बडा मंदिर यांसारख्या अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून निवेदन आयुक्तांना सादर केले.
आयुक्तांनी दिले आश्वामन
यावेळी ओसवाल नवयुवक संघाचे अध्यक्ष रोहित जैन आणि प्रकल्प संचालक पियुष गुणवंत राज कोठारी यांनी सर्व संस्थांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी जैन समाजाचे हे निवेदन स्वीकारले असून, योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनानंतर प्रशासकीय पातळीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



