बॉयफ्रेंडच्या मदतीने २ मुलांच्या आईने केली पतीची हत्या

करीमनगर, तेलंगणा: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवण्यासाठी एका महिलेने अत्यंत क्रूरतेने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील करीमनगर येथे उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून तिने आपल्या ५० वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणी पत्नीसह प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
करीमनगर येथील ग्रंथालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारा संपथ याची त्याची पत्नी रमादेवी हिने हत्या केली. रमादेवीला दारूच्या व्यसनामुळे पतीकडून नेहमी मारहाण होत होती. त्यांना दोन मुले आहेत. रमादेवी छोटंसं स्नॅक्स कॉर्नर चालवत होती. याच दरम्यान तिची ओळख ५० वर्षीय राजय्या याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पती संपथ त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने रमादेवीने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावरून सुचली कल्पना
पतीला संपवण्यासाठी रमादेवीने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले. एका व्हिडिओमध्ये खून करण्याची योजना सांगितली होती, ती पाहून तिने आपल्या प्रियकर राजय्यासोबत पतीच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार, हत्येच्या रात्री राजय्या आणि त्याचा मित्र श्रीनिवास यांनी संपथला बॉम्माकल उड्डाणपुलाजवळ दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले. संपथ खूप दारू प्यायल्याने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. याच वेळी राजय्याने त्याच्या कानात कीटकनाशक टाकून त्याचा जीव घेतला. हत्येनंतर राजय्याने फोन करून रमादेवीला ही माहिती दिली.
बायकोनेच दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार
हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी रमादेवीने पोलिसांकडे पती संपथ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. १ ऑगस्ट रोजी संपथचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करू नये अशी विनंती रमादेवी आणि राजय्याने केली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. संपथच्या मुलानेही वडिलांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी तांत्रिक तपासणी करत फोन कॉल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर रमादेवी, राजय्या आणि श्रीनिवास यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.



