काजोलचा ‘मराठी बाणा’! हिंदीत प्रश्न विचारणाऱ्याला झापलं, ‘ज्याला समजायचं आहे, त्याला…’

मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोलची विशेष छाप पडली. मुंबईत आयोजित या सोहळ्यात काजोलचा मराठी बाणा दिसून आला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं काजोलला गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काजोलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना, काजोलनं सर्वप्रथम मराठीतून सगळ्यांना अभिवादन केलं. तेव्हा संपूर्ण सभागृहातून टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. त्यानंतर काजोलनं अस्खलित मराठीतून भाषण केलं. सुमारे 3 दशकं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या काजोलला, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर काजोल आणि आई भावूक
काजोलने पुरस्कार स्विकारल्यानंतर ज्या मंचावर एकेकाळी माझ्या आईचा सन्मान झाला, तिथेच आज माझा सन्मान आहे असं सांगताना गहिवरली होती. “सर्वांना नमस्कार, आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या मंचावर इतक्या मोठ्या लोकांवर उभी आहे. अनुपम खेर यांनी माझ्यासाठी खूप चांगलं भाषण केलं आहे. यानंतर मी काय बोलणार. माझ्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे. माझी आई आज येथे माझ्यासोबत बसली आहे. मी तिचीच साडी नेसली आहे. हा पुरस्कार माझ्याआधी तिला मिळाला होता. मला माझ्या वाढदिवसाला यापेक्षा मोठा पुरस्कार मिळू शकत नव्हता. आज मी या मंचावर उभी आहे आणि आपण काहीतरी केलं आहे हे या पुरस्काराने जाणवलं आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.



