AmravatiLatest News

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडून सुदर्शन नगर येथील वाल्मिकी सभागृह आणि स्वच्छता कामांची पाहणी

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज फ्रेजरपुरा प्रभागातील सुदर्शन नगर येथील वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाची पाहणी केली. हे सभागृह नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, यासाठी आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

सभागृहाच्या पाहणीनंतर आयुक्तांनी जुनाबायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी केली. या ठिकाणी स्वच्छतेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत त्यांनी परिसर स्वच्छ व स्वच्छतामय ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन, व स्वच्छ भारत अभियानाचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आयुक्तांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत महापालिकेची सर्व कामे पारदर्शक व नियोजनबद्ध रितीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामास गती द्यावी, तसेच कामामध्ये गुणवत्ता आणि टिकाऊपणा यास प्राधान्य द्यावे. काम नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या वापरासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. जुनाबायपास व ऑक्सिजन पार्क परिसरात दररोज नियमित स्वच्छता करणे अनिवार्य करावे. कचरा संकलन व विलगीकरण योग्य पद्धतीने करण्यात यावे, यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. स्वच्छता निरीक्षकांनी क्षेत्राची नियमित तपासणी करावी आणि आढळणाऱ्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात. नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी वेळोवेळी करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवावी आणि त्यांच्यावर आवश्यकतेनुसार कारवाई करावी. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत.
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीसंदर्भात नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अमरावती घडवण्यासाठी महापालिकेबरोबरच नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. कृपया सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नका, कचरा विलगीकरणाचे पालन करा आणि आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यास हातभार लावा.
तसेच त्यांनी याही बाबतीत आवाहन केले की, महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करा, कुठेही अस्वच्छता, अडथळा किंवा सार्वजनिक मालमत्तेची हानी होत असल्यास त्वरित महानगरपालिकेला कळवा. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
स्वच्छ अमरावती ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून, त्यांनी ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ ही भावना प्रत्येकाने अंगीकारावी, असेही आवाहन केले.
या दौऱ्यात शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त नितीन बोबडे, नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, प्रभागातील स्वच्छता निरीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button