पोलीस कर्मचाऱ्याची हत्या! पतीच निघाला मास्टरमाईंड; दोन सुपारी किलरसह प्रेयसीला अटक

अमरावती : अमरावती शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येचं गूढ अखेर पोलिसांनी उकललं आहे. ही हत्या कोणत्याही बाह्य वादातून नव्हे, तर तिच्या पतीनेच पाच लाखांची सुपारी देऊन घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपी राहुल तायडे याने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन सुपारी किलर – श्रेयस महल्ले आणि ओम शिकार यांना अटक केली असून, या कटात सहभागी असलेल्या राहुल तायडेच्या प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आशा तायडे या पोलीस खात्यात कार्यरत होत्या. त्यांच्या कर्तव्यात वागणुकीत कुठलाही संशय न वाटणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या हत्येने पोलिस वर्तुळात आणि समाजातही खळबळ उडवली होती. प्रारंभी हा गुन्हा अज्ञात व्यक्तींच्या विरोधात नोंदवण्यात आला होता. मात्र, सखोल तपासादरम्यान पतीचाच सहभाग असल्याचं पुराव्यानिशी उघड झालं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल तायडे आणि त्याच्या प्रेयसीमध्ये प्रेमसंबंध होते. या नात्याला आशा आडवी येत असल्याने राहुलने हटके मार्गाने तिला हटवण्याचा निर्णय घेतला. या गुन्ह्याची आखणी ठरवून त्याने सुपारी किलर्समार्फत हत्या घडवून आणली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



