क्रेटा कारचा थरार: खुलताबादमध्ये पादचाऱ्यांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: आज सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एका क्रेटा कारने दोन पादचाऱ्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा अपघात छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रस्त्यावरील नंद्राबाद येथे सकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास झाला. एका भरधाव क्रेटा कारने (क्रमांक २४ बीएच ५६६३ डी) रस्त्याने पायी चाललेल्या अशोक यादवराव घुसळे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर क्रेटा कारचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास सुरेश तावणे यांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांनी म्हैसमाळ रोडवरील जरबक्ष उर्स मैदानात आरोपी चालकाला त्याच्या पत्नीसह ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, हा चालक सैनिक असल्याचे समजते. पोलिसांनी ही रक्ताने माखलेली क्रेटा कार खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा केली आहे.
मृत व्यक्तींचे मृतदेह खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या खुलताबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपीला वेळीच पकडण्यात यश आले आहे.



