AmravatiLatest News
शेतकरी आत्महत्या! मोर्शीतील कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

अमरावती: मोर्शी तालुक्यातील ब्राम्हणवाडा दिवे येथे एका 60 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. श्रीधर दिगांबर दिवे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शेती आणि घराच्या बांधकामासाठी सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
खरीप हंगामात कपाशीच्या पिकावर रोगराई आल्याने आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे कर्ज फेडण्याची शक्यता संपुष्टात आल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले जात आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन योग्य ती मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



