मालमत्ता कर वसुली शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद – पहिल्याच दिवशी १.४१ कोटींची विक्रमी वसुली
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने २ व ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, आज शिबिराच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शहरातून तब्बल ₹१.४१ कोटींची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली.
करदात्यांनी मोठ्या संख्येने शिबिरांना भेट देत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आपले कर भरणे प्राधान्याने पार पाडले. झोननिहाय वसुली पुढीलप्रमाणे झाली आहे:
झोन १ : ₹३५.५ लाख
झोन २ : ₹४८.२४ लाख
झोन ३ : ₹२८.७९ लाख
झोन ४ : ₹२०.७९ लाख
झोन ५ : ₹७.९३ लाख
महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात १०% सवलत, ऑनलाईन पेमेंटवर अतिरिक्त ३% सवलत, तसेच पारदर्शक आणि सुलभ सेवा यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शहरातील विविध ठिकाणी माहिती कक्ष, हेल्पडेस्क आणि कर वसुली लिपिकांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा उपयोग करत महापालिकेच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
शिबिरांना भेट देण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, तसेच विविध क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी शिबिरांच्या आयोजनाची पाहणी करत नागरिकांशी थेट संवाद साधून अभिप्राय नोंदवले.
उद्या रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी शिबिराचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.
महापालिकेने नागरिकांना डिजिटल व्यवहारांचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आणि वेळेवर कर भरून शहराच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले आहे.



