निवडणुकीपूर्वी नागपूर महापालिकेला सरकारकडून मोठं गिफ्ट; तब्बल 315 कोटींचा निधी

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून नागपूर मनपाला आर्थिक बुस्ट देण्यात आलं आहे. पुढील काही महिन्यांत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने नागपूर महापालिकेला महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकासकामांसाठी 315 कोटी रुपयांचा निधी दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने दोन स्वतंत्र अध्यादेशांद्वारे 175 कोटी आणि 140 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या माहितीला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मंगळवारी महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक घेत कामांसाठीचे नवे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या एकूण निधीपैकी 70 ते 80 कोटी रुपये दहाही झोनमधील कामांसाठी देण्यात येणार आहेत. या कामांमध्ये नदी आणि नाल्यांच्या संरक्षक भिंती बांधणे, पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्यांचे जाळे उभारणे, सांडपाणी वाहिन्या टाकणे, लहान पूल बांधणे आदी कामांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या एकूण निधीपैकी २१५ कोटींचा निधी विधानसभानिहाय आमदारांनी सादर केलेल्या कामांच्या प्रस्तावासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम, कृष्णा खोपडे यांच्या पूर्व, मोहन मतेंच्या दक्षिण नागपूर, प्रवीण दटके यांच्या मध्य नागपूर, विकास ठाकरेंच्या पश्चिम नागपूर आणि नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूरच्या मतदारसंघाचा समावेश आहे.
या प्रकल्पांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे. शहरातील सहापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार असल्याने या भागांमधील कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त झाल्यामुळे आता आमदारांकडून त्यांच्या विधानसभा क्षेत्रात प्राधान्याने करायची असलेल्या कामांचे प्रस्ताव देण्यात येत आहे. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंटीकरण करणे, गटारांची झाकणे आदी कामांचा यात समावेश आहे. यातील अनेक कामांचे प्रस्ताव हे तातडीची कामे याअंतर्गत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रस्ताव तातडीने तयार करा, विविध विभागांना आदेश
राज्य सरकारकडून अनेक प्रयत्नांनंतर निधी मिळाल्याने आता महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, उद्यान आणि क्रीडा विभाग यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ते तातडीने सादर करावेत, जेणेकरून या विभागांशी संबंधित कामे तातडीने मार्गी लागू शकतील. महापालिका प्रशासनाकडूनही मिळालेल्या निधीतून शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेली मात्र, निधीअभावी रखडलेली कामे निवडणुकांच्या आधी तातडीने पूर्ण व्हावीत, हाच यामागचा उद्देश आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.



