नागपूरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश!

सोशल मीडियावर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाहित पुरुषांची फसवणूक – समीरा फातिमाला अटक
नागपूर : नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून ओळख मिळवलेली समीरा फातिमा हिला गिट्टीखदान पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दीड वर्षांपासून फरार असलेल्या या महिलेवर अनेक विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समीरा फातिमा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधायची. प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि मग खोट्या लग्नाच्या माध्यमातून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायची.
लग्नानंतर काही दिवसांतच ती संबंधित पुरुषांवर खोटे आरोप लावत कोर्टकेसची धमकी देऊन लाखो रुपयांची वसुली करत होती. अनेक पीडितांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली होती.
गिट्टीखदान पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून अखेर समीराचा ठावठिकाणा शोधून काढला आणि तिला अटक करण्यात यश मिळवले.
पोलिसांकडून पुढील तपास सुरु
समीरा फातिमाच्या फसवणुकीच्या प्रकारात आणखी किती व्यक्ती फसले आहेत, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. दरम्यान, समाजमाध्यमांवर ओळख वाढवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध जनजागृती करण्याची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.



