उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ९ सप्टेंबरला मतदान, २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इच्छुक उमेदवार २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारी अर्जांची छाननी २२ ऑगस्ट रोजी होईल आणि २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. आवश्यक असल्यास ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
जगदीप धनखड यांनी आरोग्यविषयक कारणे देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला होता. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे अनिवार्य झाले होते. संविधानाच्या कलम ६८ नुसार, उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली जाते.
या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य (निवडून आलेले आणि नामनिर्देशित) मतदान करतात. देशाच्या या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी आता कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



