डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अन् भारताने रशियाकडून तेल खरेदी केली बंद; नेमकं काय घडलं?

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं (India Paused on Russian Oil Purchases) वृत्त रॉयटर्सने दिलंय. गेल्या आठवड्यापासून तेल खरेदी थांबवल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकार आणि संबंधित कंपन्यांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
रशियाकडून तेल खरेदीवर दिली जाणारी सवलत कमी होणे आणि ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर ही तेल खरेदी थांबवल्याचं कारण रॉयटर्सने दिलंय. रशियन तेलाऐवजी आता भारतीय सरकारी कंपन्या पश्चिम आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील कच्च्या तेलावर अवलंबून असतील, असा दावा रॉयटर्सने या वृत्तातून केला आहे.
आता तेल खरेदी कुठून होत आहे?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि मंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) यासारख्या सरकारी मालकीच्या रिफायनर्सनी गेल्या एका आठवड्यापासून रशियाकडून तेल खरेदी केलेले नाही. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की या कंपन्यांनी तेल खरेदी करण्याच्या त्यांच्या योजना बदलल्या आहेत. या चार रिफायनरी कंपन्या सहसा रशियाकडून तेल खरेदी करतात. आता या कंपन्या स्पॉट मार्केटमधून तेल खरेदी करत आहेत. स्पॉट मार्केट म्हणजे जिथे तात्काळ डिलिव्हरीसाठी तेल खरेदी केले जाते. या कंपन्या बहुतेक अबू धाबीसारख्या मध्य पूर्वेकडील देशांकडून मुर्बन क्रूड आणि पश्चिम आफ्रिकन देशांमधून तेल खरेदी करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती नाराजी-
रशियाकडून भारताने कच्च्या तेलाच्या खरेदीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% शुल्क लादले आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारत एक प्रकारे रशियाला पाठिंबा देत आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, ब्लूमबर्गच्या मते, एका मोठ्या भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची कंपनी आता मध्य पूर्व आणि आफ्रिकेतून अधिक कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, पुढे काय करावे याबद्दल ते सरकारशी चर्चा देखील करतील. तसेच या निर्णयामुळे खर्च वाढेल आणि नफा कमी होईल.



